संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या आठवड्यात गाजत असलेल्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी कौतुक केले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित व अभिनेता अंकुश चौधरी यांनी साकारलेल्या महाराष्ट्र शाहीर यांचे भूमिकेचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. मराठी साहित्यात ज्यांचे नाव आदराने घेतल्या जाते व संपूर्ण एका पिढीला वाचनाची आवड निर्माण करणारे सुप्रसिद्ध पानिपतकार विश्वास पाटील यांनी हा चित्रपट नुकताच बघितला व त्यांनी या चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले आहे.
त्यांनी या चित्रपटाविषयी म्हटले
अंकुश चौधरी यांच्या अजोड, अभूतपूर्व आणि आऊटस्टँडिंग अभिनयासाठी व शाहीर साबळे यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने पहावा असा चित्रपट,"महाराष्ट्र शाहीर" खरे तर परराज्यातील दौऱ्यामुळे हा सिनेमा पहायला मला थोडा उशीरच झाला. अखेर तो काल पाहिला.
प्रथमतः शाहीर साबळे यांच्या भूमिकेत आणि त्यांच्या जीवनातील स्थित्यंतरामध्ये अंकुश चौधरीने ज्या तन्मयतेने स्वतःला झोकून ही अभूतपूर्व चरित्ररेखा उभी केली आहे, त्याबद्दल अंकुशला अनेक सलाम !
गेल्या 30-35 वर्षात बॉलीवूड व हॉलीवुडचे अनेक चरित्रपट मी पाहिले आहेत. परंतु "गांधी" सिनेमा नंतर एखाद्या चरित्रपटात एखादा अभिनेता अशा पद्धतीने दिसतो, पोचतो आणि घुसतो याचे "महाराष्ट्र शाहीर" हे उत्तम उदाहरण आहे. या यशाबद्दल अंकुशचे अभिनंदन.
विशेषतः 1990 मध्ये मुंबईत आल्यावर पुढे चार वर्षे रवींद्र नाट्यमंदिर, फिल्मसिटी आणि मंत्रालयात शाहीर साबळे यांच्या भेटीगाठी होण्याचे अनेक प्रसंग आले. त्यांना खूप जवळून पाहता आले. या चित्रपटातील अखेरच्या पर्वातील अंकुशचे सादरीकरण व त्याने जीवापाड घेतलेली मेहनत तर केवळ लाजवाब अशीच आहे. त्यात चित्रपटाचे दिग्दर्शक व रंगभूषाकारांचेही उत्तम योगदान मान्य करायला हवे.
भानुमतीसाठी त्यांच्या वडिलांनी केलेली पोलीस तक्रार व त्यांचे पसरणीला येणे हा नाट्यप्रसंग अकारण टाळला गेला. मध्यंतरापुर्वी शाहीर जिल्हा कार्यालयावर तिरंगा घेऊन छतावर चढतात व त्यांना कोणीच रोखत नाही. तसेच चित्रपटाचे शेवटी त्यांना कलकत्त्यात आलेले यश व त्यानंतरचा चित्रपटाचा शेवट एखाद्या नाट्यप्रसंगाने अधिक रंगवता आला असता. येथे शाहिरांच्या जीवनातील अस्सल नाट्यप्रसंग पटकथेने वेचले असते तर अधिक बरे झाले असते.
परंतु तरीही ज्या परिस्थितीमध्ये केदार शिंदे यांनी या चरित्रपटाची जोखीम उचलली आणि पेलली ते खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक महान कलावंत किंवा लेखकास असा प्रतिभावंत व कृतज्ञ नातू भेटणे केवळ दुरास्पदच आहे. केदार तुझे खास अभिनंदन !
प्रत्येक मराठी माणसाने अंकुश चौधरीच्या अभिजात अभिनयासाठी आणि शाहीर साबळे यांनी महाराष्ट्रावर व मराठी भाषेवर केलेल्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा सिनेमा पाहिलाच हवा असा आहे.
ज्येष्ठ संगीतकार अजय- अतुल यांनी 'नटरंग' आणि 'सैराट' ला एकापेक्षा एक अशी सामान्य रयतेच्या गळ्यापर्यंत आणि घराघरापर्यंत सुंदर गाणी पोहोचवली. तसेच एखादे दुसरे बहुजनांच्या हाडापेरापर्यंत पोचणारे गीत त्यांच्याकडून या सिनेमासाठी लाभले असते तर दुधात साखर पडली असती .
मराठी भाषेवर व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट जरूर पाहावा इतका तो निश्चितच उत्तम आहे. –विश्वास पाटील