स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये नवी मुंबई देशातील तृतीय क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर (3rd Cleanest City in India)



महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई नेहमीप्रमाणेच नंबर वन

कचरामुक्त शहराचे 'फाईव्ह स्टार' मानांकन मिळविणारे नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर
       “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा (3rd Rank in India) बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच नवी मुंबई नंबर वनचे स्वच्छ शहर आहे. नवी दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियम येथे आयोजित 'स्वच्छ अमृत महोत्सव' भव्य समारंभात महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माजी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री ना.श्री.हरदीपसिंह पुरी व राज्यमंत्री ना.श्री.‌कौशल किशोर, केंद्रीय सचिव श्री. मनीष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
      या विशेष समारंभात 'कचरामुक्त शहरांमध्ये' नवी मुंबई महानगरपालिकेस 'फाईव्ह स्टार मानांकन' प्राप्त झाले असून हे मानांकन मिळवणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबई शहरास 'वॉटर प्लस' हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. 
      या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी माजी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशन नमुंमपा कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 1 उपआयुक्त उपआयुक्त श्री दादासाहेब चाबुकस्वार आणि परिमंडळ 2 उप आयुक्त डॉ. अमरीश पटनिगेरे उपस्थित होते.      
      'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये देशभरातील 4360 शहरे सहभागी झाली होती. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविला.
       'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील 'फाईव्ह स्टार मानांकन' प्राप्त एकमेव शहर आहे. तसेच हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील (ओडीएफ) 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन मिळविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.
      शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रीय सहभाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे राष्ट्रीय सन्मान असल्याचे मत पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त करीत हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना समर्पित केले आहेत.
        नवी मुंबई शहर नेहमीच स्वच्छतेमध्ये आघाडीवर राहिले असून यामध्ये नागरिकांच्या सहभागाचा सर्वात मोठा वाटा आहे. हा पुरस्कार महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रसारमाध्यमे अशा सर्वांच्या एकत्रित कामाचे फलित असल्याचे मत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त करीत नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे. 
       यावर्षी 'स्वच्छ सर्वंक्षण 2022' मध्ये 3 सत्रांत कागदपत्रे तपासणी तसेच नागरिकांचे अभिप्राय या पध्दतीने परीक्षण करण्यात आले. याशिवाय अखेरच्या परीक्षणात केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांव्दारे पूर्वकल्पना न देता महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची  प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी करताना परीक्षण समिती सदस्यांकडून कोणत्याही नागरिकाशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले. त्याचप्रमाणे  स्वच्छता ॲप, दूरध्वनी यावरूनही कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून त्याच्या शहर स्वच्छता विषयक प्रतिक्रियांची नोंद घेण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे. 

वैशिष्टयपूर्ण कामे :- 
           ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय वाक्य नजरेसमोर ठेवून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच प्रभावी लोकसहभागावर भर दिला. त्यामुळे नागरिकांच्या सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र पहायला मिळाले. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था, मंडळे, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना यांचेही सक्रीय योगदान लाभले. लोकप्रतिनिधींप्रमाणेच स्वच्छताप्रेमी नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. प्रसार माध्यमांनीही चांगल्या स्वच्छता कार्याला प्रसिध्दी देऊन नागरिकांना प्रोत्साहित केले. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून नवी मुंबईने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये आपले मानांकन उंचावत देशात तृतीय  क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविला आहे. 
         यावर्षी स्वच्छतेसोबत शहर सुशोभिकरणाच्या अत्यंत अभिनव संकल्पना राबविण्यात आल्या. यामध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, रचना संसद, रहेजा अशा विविध कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत कल्पक भित्तीचित्रांनी शहर सजून गेले. महत्वाच्या चौकातील लक्षवेधी शिल्पाकृती, विद्युत दिपांनी उजळलेले उड्डाणपुल, झळाळणारे अंडरपास, आकर्षक विद्युत खांब, स्वच्छ तलाव व जलाशयांच्या काठावर रेखाटलेल्या चित्राकृती, नवी मुंबईच्या मूळ आगरी, कोळी लोकसंस्कृतीपासून ते महाराष्ट्रतील व भारतातील विविध प्रातांमधील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची रेखाटलेली रंगचित्रे अशा सर्व गोष्टींमुळे शहराचे रुपच बदलून गेले. नवी मुंबईच्या या बदलत्या आकर्षक स्वरुपाची प्रशंसा शहरातील नागरिकांप्रमाणेच शहराला भेट देणा-या इतर शहरातील मान्यवरांनी, पर्यटकांनी व प्रवाशांनी केली. त्याचप्रमाणे या सुशोभिकरण कार्याचा आढावा घेणाऱ्या‌ आकर्षक कॉफी टेबल बुकचीही प्रशंसा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली. 
          शहर सुशोभिकरणात यावर्षी आगळीवेगळी अशी चित्रकविताभिंतींची संकल्पना राबविण्यात आली. मराठी साहित्यातील नामवंत कवींच्या प्रसिध्द कवितांच्या ओळी त्याला पुरक छायाचित्रांसह रेखाटून साकारलेल्या चित्र कविता भिंतींतून वाचन संस्कृतीचा प्रसार झाला. शिवाय साहित्य संपदेला प्राधान्य देणारे शहर असाही नवी मुंबईचा गौरव विविध स्तरांतून झाला. 
          या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ कवी संमेलन' या अभिनव उपक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. रामदास फुटाणे, अशोक नायगांवकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे अशा मराठी व हिदीतील नामवंत कवींनी यामध्ये सहभागी होत साहित्यासह स्वच्छतेचा जागर केला. 
        यावर्षी शहरात विविध 30 हून अधिक ठिकाणी 'डोनेशन बॉक्स' ही वेगळी संकल्पना राबविण्यात आली. नागरिकांनी त्यांना नको असलेल्या घरातील वस्तू, कपडे, साहित्य या डोनेशन बॉक्सच्या ठिकाणी आणून ठेवावे व गरजूंनी ते त्या ठिकाणाहून घेऊन जावे अशा 'नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या' या‌ नाविन्यपूर्ण संकल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला मिळाले. 
    .     अशाचप्रकारे नागरिकांमार्फत होणारे लग्न, वाढदिवस आदी समारंभाप्रसंगी अन्न उरल्यास ते संकलीत करून त्याचे वितरण गरजूंना करण्यासाठी 'फुड बँक'ची अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. 
          स्वच्छता विषयक जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण नवी मुंबईतील 111 प्रभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्य उपक्रमास ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ पुरस्कार मिळाला. 
           अशाचप्रकारे नवी मुंबईचे आकर्षण स्थळ असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 'टाकाऊपासून टिकाऊ' या संकल्पनेतून 28.5 फूट इतक्या उंचीची भव्यतम फ्लेमिंगो शिल्पाकृती 26 वेगवेगळ्या यंत्रातील 1790 टाकाऊ यंत्रभागांपासून साकारण्यात आली आहे. त्याचीही विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्ये झाली. 
       जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याठिकाणी साकारलेल्या निसर्गोद्यान परिसराला हिरवाईची झळाळी देत तेथे लागवड केलेल्या 60 हजाराहून अधिक देशी प्रजातीच्या वृक्ष लागवडीमुळे नवी मुंबईच्या पर्यावरणात लक्षणीय भर पडली असून जैवविविधतेतही वाढ झाली आहे. 
       महानगरपालिका क्षेत्रात 7 अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रे कार्यान्वित असून त्यामधील कोपरखैरणे व ऐऱोली या 2 मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.ली. क्षमतेचे टर्शअरी ट्रिटमेंट प्रकल्प विकसित करण्यात आले असून त्यामधील पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी टिटिसी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात बचत होणार असून महानगरपालिकेस पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी विक्रीतून निधीही प्राप्त होणार आहे. 
      .   याशिवाय नागरिकांच्या कल्पनाशक्तीला मुक्त व्यासपीठ देऊन स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण तांत्रिक संकल्पना मांडण्याकरिता "स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये 39 स्पर्धकांनी सहभागी होत स्वच्छता विषयक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प सादर केले. 
          लोकसहभागावर भर देताना त्यामध्ये विविध समाज घटकांचा सहभाग असावा यादृष्टीने तृतीयपंथी नागरिकांना स्वच्छता प्रचार - प्रसार कार्यात सहभागी करून घेण्यात आले. याव्दारे उपेक्षित घटकांना मूळ प्रवाहात सहभागी करून स्वच्छता कार्याला गती लाभली. 
      .   गणेशोत्सव कालावधीतील विसर्जन स्थळांवर वेगळे संकलीत करण्यात आलेले 40 टनाहून अधिक निर्माल्य एकत्र करून त्यावर स्वतंत्रपणे खत निर्मिती प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचप्रमाणे एक स्वयंसेवी संस्था निर्माल्यापासून उदबत्त्या बनविण्याचा प्रकल्पही राबवित आहे. 
      .   'थ्री आर' अर्थात कच-याचा पुनर्वापर (Reuse), कचरा निर्मितीत घट (Reduce) व कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात असून ‘ग्रीनसोल’ या अभिनव उपक्रमांतर्गत सोसायटी, वसाहती येथे संकलन डबे ठेवून 1 लाखाहून अधिक जुने वापरात नसलेले बूट / चप्पल यांचे संकलन करण्यात आले आहेत व त्यांचे नुतनीकरण करून गरजूंना वितरण करण्यात आले आहे. 
    .     प्लास्टिकचे रॅपर्स व लहान तुकडे प्लास्टिक बाटल्यांतून विद्यार्थ्यांमार्फत साठवून ‘प्लास्टिमॅन’ उपक्रमांतर्गत प्रतिमहा 800 हून अधिक प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात येत आहे. 
    .    प्रायोगिक तत्वावर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हनुमान नगर तुर्भे, इंदिरानगर तुर्भे, अडवली भुतावली, समतानगर ऐरोली, बिंदुमाधव नगर दिघा अशा 5 झोपडपट्ट्यांमध्ये कचरा वेचक महिलांमार्फत दैनंदिन कचरा संकलित करून त्यामधील ओल्या कच-याचे त्या परिसरातच कम्पोस्ट पीट्स तयार करून विल्हेवाट लावली जात आहे. या 'झिरो वेस्ट स्लम मॉडेल' व्दारे कचरा वाहतुकीच्या खर्चात लक्षणीय बचत होत आहे तसेच कचरा वेचक महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे सक्षमीकरण झाले आहे. या ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ची विशेष दखल राज्य व केंद्र शासनामार्फत घेण्यात आली असून नमुंमपा क्षेत्रातील इतर झोपडपट्ट्यांमध्येही या मॉडेलचा प्रभावी वापर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 
     .    पाळीव प्राण्यांनी कोठेही शौच केल्याने होणारी अस्वच्छता टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘पेट कॉर्नर’ ही अभिनव संकल्पना राबविली जात असून त्यालाही पाळीव प्राणी असलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेत आहे. 
           स्वच्छतेच्या अंगाने विशेष लक्षवेधी बाब म्हणजे मोठ्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊन ते अस्वच्छ होऊ नयेत याकरिता त्यांच्या काठांवर बसविण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या उंच जाळ्या तसेच नाल्यांच्या प्रवाहात कचरा असल्यास तो वाहून न जाता एके ठिकाणी अडकून साफ करता यावा याकरिता नाल्यांच्या प्रवाहात लावण्यात आलेल्या नेट या दोन महत्वाच्या उपाययोजनांमुळे नाले स्वच्छ रहात असून याचीही दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने तलाव असून त्यांचा जलाशय नेहमीच स्वच्छ रहावा याकडेही काटेकोर लक्ष दिले जात आहे. 
           महापालिका क्षेत्रात घरात निर्माण होणा-या कच-याचे घरातच वर्गीकरण करून तो कचरा गाड्यांमध्येही वेगवेगळा देण्यात येतो. कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आर.एफ.आय.डी. तंत्रप्रणाली राबविण्यात येत असल्याने कचरा संकलनाप्रमाणेच योग्य पध्दतीने कचरा वाहतुकीतही नवी मुंबई नेहमीच आघाडीवर राहिली आहे. ओला, सुका त्याचप्रमाणे घरगुती घातक कचराही वेगळा संकलीत करण्यावर भर दिला जात आहे. 
     .     तुर्भे एम.आय.डी.सी. येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी खत व प्लास्टिक ग्रॅन्युल्स तसेच फ्युएल पॅलेटस् निर्मिती प्रक्रिया केली जात असून त्यामध्ये बांधकाम, पाडकाम कचरा अर्थात डेब्रिजच्या सुयोग्य विल्हवाटीसाठी 'सी अँड डी वेस्ट प्लान्ट' कार्यान्वित आहे. 
      .    दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या शहरातील अनेक सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स, उद्योग समूह यांनी आपल्या आवारातच ओल्या कच-यापासून खत प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा तसेच उद्यानांमध्येही खत प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. 
          शौचालय व्यवस्थापनामध्ये शौचालयांच्या नियमित स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले जात असून शहरातील 406 सार्वजनिक व सामुदायिक शौचालये गुगल मॅपवर सहजपणे उपलब्ध आहेत. शौचालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून 21 ई टॉयलेटपैकी विशेष सुविधांसह महिलांकरिता स्वतंत्र SHE टॉयलेटही कार्यरत आहेत. दिव्यांग व लहान मुले यांच्याकरिताही शौचालयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या शौचकुपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी तेथील स्वच्छता व अनुषांगिक बाबींवर नागरिकांना अभिप्राय देण्यासाठी क्यू आर कोड प्रणालीची व्यवस्था करण्यात आलेली असून अभिप्रायांची दखल घेतली जात आहे. स्वच्छतेविषयीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी विशेष तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित असून प्राप्त तक्रारींचे 24 तासात निराकरण करण्यात येत आहे. 
           17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार 53 हजाराहून अधिक युवकांच्या सहभागाने सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात भव्यतम उपक्रम राबविण्यात आला. त्याबद्दल कालच नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वोत्तम युवक सहभागाचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. त्याचप्रमाणे या उपक्रमाची विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मध्येही झाली. 
          इंडियन स्वच्छता लीगसाठी सुप्रसिध्द संगीतकार, गायक व नवी मुंबईकर रहिवाशी पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ हा संघ जाहीर करण्यात आला व त्या अंतर्गत एक लाखाहून अधिक नागरिकांनी रजिस्ट्रेशन करीत सहभाग नोंदविला. 
           इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत  मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला. त्यासही 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स'चा बहुमान लाभला. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीम राबवून तेथून जमा करण्यात आलेला कचरा फ्लेमिंगो रेखाकृतीच्या आत जमा करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपत फ्लेमिंगो सिटी ही नवी मुंबईची ओळख अधोरेखीत करण्यात आली. 
           अशाचप्रकारे सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी 207 तृतीयपंथी नागरिकांनी ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करत परिसर स्वच्छता केली व जनजागृती रॅली काढली. याचीही विशेष दखल 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स' यांनी घेतली. 
          त्याचप्रमाणे पारसिक हिल, सीबीडी, बेलापूर येथे युवकांनी एकत्र येत ओला, सुका व घरगुती घातक कच-याच्या वर्गीकरणाचे महत्व निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाच्या छत्र्या प्रदर्शित करून वेगळ्या प्रकारे केले तसेच परिसराची स्वच्छताही केली. 
            अशाप्रकारे विविध स्वरुपातील स्वच्छता विषयक केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचे फलित म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई शहरास देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा पुरस्कार, राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर तसेच कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग व ओडीएफ कॅटेगरीत वॉटरप्लस हे सर्वोत्तम मानांकन असे विविध बहुमान प्राप्त झाले असून हा प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचा सन्मान आहे. 
       यामध्ये महापालिका अधिकारी-कर्मचारी, विशेषत्वाने सफाई कामगार आणि स्वच्छतेविषयी जागरूक लोकप्रतिनिधी, विविध संस्था-मंडळे तसेच विविध वयोगटातील नागरिक, प्रसारमाध्यमे अशा सर्वच घटकांनी आपले अनमोल योगदान दिलेले आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार व अभिनंदन करीत स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने यापुढील काळात 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' ला सामोरे जाताना राष्ट्रीय मानांकन उंचाविण्यासाठी 'निश्चय केला, नंबर पहिला' हाच ध्यास नजरेसमोर ठेवून सर्वजण‌ एकत्र येऊन अधिक जोमाने काम करतील असा विश्वास माजी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त केला आहे.
Previous Post Next Post