राजेश नार्वेकर यांनी स्विकारला नवी मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार

राजेश नार्वेकर यांनी स्विकारला नवी मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार
           ठाणे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या आणि प्रशासनाच्या विविध पदांवरील कामाचा गाढा अनुभव असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी त्यांचे महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले.

           इतिहास विषयात उच्च पदवीधर असणारे श्री. राजेश नार्वेकर २००९ च्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी असून ठाणे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी ते मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून कार्यरत होते.
             जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजना राबवित अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यात आली. त्यामध्ये –

• मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट परिसरात पारदर्शक स्कायवॉक, व्हयूविंग गॅलरी तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे. 

• वन पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत मुरबाड तालुक्यातील थितबी, नाणेघाट तसेच भिवंडी तालुक्यातील पडघा वन क्षेत्रातील सोनाळे येथे वन पर्यटन केंद्र उभारणी. 

• माळशेज घाट परिसरात दरड कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक भागामध्ये जाळी बसविण्याची कामे.

• पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत माळशेज घाट, मुरबाड तालुक्यातील गोरखगड, पळू, शिंगापूर तसेच ठाणे जिल्ह्यातील हुतात्मा भाई कोतवाल यांचे समाधीस्थळ असलेले सिध्दगड या विविध पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटकांसाठी मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे.

• वन्यजीवांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात व बारमाही उपलब्ध व्हावे यासाठी भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनतलाव व वन बंधारे बांधणे. 

• सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा करुन गावे टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न.
• शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी औजार बँक संकल्पना महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविणे.
• विकलांग व्यक्तींना बॅटरी ऑपरेटेड मोपेड बाईक्स उपलब्ध करुन देऊन स्वयंरोजगारासाठी चालना. 
• कृषि विषयक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात आले तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत भाजीपाला लागवड कार्यक्रम किंवा शेडनेट कार्यक्रमासारखे विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

          कोरोना काळात वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करत असतांना जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मॉडयुलर ऑपरेशन थिएटर तर काही रुग्णालयामध्ये मॉडयुलर लेबर रुम व आधुनिक पध्दतीच्या लाँड्रीज उभारण्यात आल्या.

• जांभूळ तालुक्यातील कल्याण येथील भिक्षेकरी गृहाच्या पडीक असलेल्या साधारणतः 60 एकरपेक्षा अधिक जमिनीवर आधुनिक शेती प्रकल्प राबविण्यात येत असून तेथेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रथमच कृषि पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे.

• ठाणे शहरात असलेल्या स्पोर्टस एक्सेलन्स सेंटर येथे जागतिक दर्जाचे वेटलिफ्टींग खेळाचे साहित्य खेळाडूंना दैनंदिन सरावासाठी उपलब्ध करुन देण्यात आले.

• ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या टाऊन हॉल व स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानाचे उन्नतीकरण करण्यात आले.

अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण कामांचा समावेश आहे.

           त्याचप्रमाणे कोविड-19 प्रभावित काळात

• स्थलांतरित मजूर व नागरिक यांना ठाणे येथून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी 80 रेल्वे गाड्या व 5700 एसटी बसेसची व्यवस्था केली.

• सामुदायिक स्वयंपाकघर (Community kitchen) अंतर्गत दर दिवशी 2 लाख अन्नपदार्थ वाटपाची व्यवस्था केली.

• ठाणे जिल्हयात साधारण 20,000 अत्यावश्यक धान्य पुरवठ्याचे कीट गरजूंना वाटप केले.
• 'वंदे भारत मिशन' अंतर्गत 53 देशांतून 1419 विमान सेवेद्वारे ठाणे जिल्ह्यात आलेल्या 13,834 प्रवाशांसाठी मुंबई विमानतळ ते ठाणे वाहतुकीची व्यवस्था केली. ठाणे व नवी मुंबई येथील 20 हॉटेल्समध्ये या प्रवाशांची 7 दिवस विलगीकरण व्यवस्था केली तसेच आरटी-पीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था केली. विमानतळावर विमानांचे आगमन मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळीच होत असल्याने सदरचे काम अहोरात्र सुरू राहील याबाबत काळजी घेतली.

• ठाणे येथून इतर जिल्हयांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ई- पासची व्यवस्था करुन देण्यात आली.
• ठाणे जिल्हयातील ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या 600 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे चालू राहील अशी व्यवस्था केली.

• कोव्हिड-19 उपचाराकरिता आवश्यक असलेल्या रेमडिसीवर व टॉसिझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली.

            तत्पूर्वी सन 1994 मध्ये रत्नागिरी येथून श्री. राजेश नार्वेकर यांची परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पदापासून प्रशासकीय कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर प्रांत अधिकारी, करमणूक कर विभाग, मुद्रांक शुल्क विभाग, म्हाडा, एम.आय.डी.सी. व मंत्रालयात विविध जबाबदारीच्या पदांवर त्यांनी उत्तम कामगिरी केली. जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते मुख्यमंत्री महोदय यांचे सहसचिव या पदावर कार्यरत होते.
            अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण उपक्रमांच्या नियोजनात सहभाग घेतला. यामध्ये –

• एमआयडीसी येथे कार्यरत असताना दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरीडॉरची सुरुवात झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग होता, यासाठी ते जपान येथे प्रशिक्षणासाठी देखील गेले होते.

• रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवल्या.
• मुद्रांक शुल्क विभागात काम करतांना राज्य शासनाच्या आय सरिता, ई-पेमेंट, मुद्रांक, नोंदणी व तत्सम कार्यप्रणालीसाठी माहिती तंत्रज्ञान विकसित झाले. त्यात त्यांचाही सहभाग होता. 
• मुख्यमंत्री सचिवालयात त्यांनी नगरविकासासारख्या महत्वपूर्ण आणि संवेदनशील विभागाचे काम सक्षमपणे हाताळले.

              अशा विविधांगी प्रशासकीय कामांत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या श्री.राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला असून याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देशामध्ये अव्वल स्थान असणा-या नवी मुंबई शहराचे आयुक्तपदाचा पदभार स्विकारताना अतिशय आनंद होत असल्याचे सांगितले. सन 2000 मध्ये मुंबईत पोस्टींग झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात नवी मुंबईत राहत असल्याने तसेच मागील 4 वर्षे ठाणे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याने नवी मुंबईशी कायम संपर्कात होतो असे सांगताना त्यांनी इथली स्वच्छता, टापटीपपणा सुनियोजित शहर म्हणून असलेला गौरव अधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई स्वच्छ व सुंदर होण्यासाठी यापुर्वीच्या आयुक्तांनी व आधिचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी उल्लेखनीय काम केल्याचे नमूद करीत सर्व अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रिय कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांच्या सहभागातून चांगले काम करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराचा विकास योग्य रितीने व्हावा हा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगत जनतेशी सुसंवादावर भर देऊन वेळेचे योग्य नियोजन करीत प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य व शिक्षण या महत्वाच्या विषयांकडे अधिक लक्ष देण्याप्रमाणे नवी मुंबईतील सर्व भागांचा समतोल विकास साधला जाईल व सर्वांशी समन्वय ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या हिताचे काम केले जाईल असे त्यांनी सांगितले. पाणी पुरवठा, वाहतुक समस्या, पुर्नविकास या बाबींकडेही विशेष लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. सर्वांच्या एकत्रित सहयोगाने नवी मुंबईच्या विकासासाठी यापुढील काळात अधिक जोमाने काम करण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला. 

#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #Commissioner #nmmccommissioner
Previous Post Next Post